Home / About School

 

त्रिदशकोत्तर – ज्ञानयज्ञ

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताच्या पूर्वसंध्येला गावातील विचारवंत व जेष्ठ ग्रामस्थ, तत्कालीन सरपंच श्री. मोरेश्वर चिंतामण पाटील, कै. नामदेव रामा पाटील, कै. बाळाराम पदाजी पाटील, कै. लडकू पांडूरंग पाटील, श्री. गंगाराम गौरोजी पाटील, माजी सरपंच श्री. शंकर महादेव म्हात्रे, कै. दिनानाथ बळीराम पाटील, श्री बळीराम पदाजी म्हात्रे, श्री रमेश धर्मा वेटा, कै. शामा आंबो म्हात्रे, श्री शालिक रामा आगास्कर, श्री. गजानन बाळकृष्ण पाटील, श्री. बळीराम गिरिधर पाटील, कै. चाहु जोमा पाटील, श्री. बाळाराम पदाजी म्हात्रे यांना एकत्र जमवून शिक्षण संस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडली असता सर्व मान्यवरांनी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी व वैभवासाठी एक शिक्षण संकुल निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सविस्तर चर्चा व विचारविनिमयानंतर “ज्ञान विकास संस्था कोपरखैरणे’ या नावाने संस्था नोंदणी करावी असे ठरविण्यांत आले. सदरच्या सभेमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्या खांद्यावर तर उपाध्यक्षपदी कै. बाळाराम पदाजी पाटील, खजिनदार कै. नामदेव रामा पाटील, सरचिटणीस श्री. मोरेश्वर चिंतामण पाटील, सहचिटणीस पदी कै. दिनानाथ बळीराम पाटील अशा पदाधिका-यांची व नऊ संचालकांची एक समिती नियुक्त करण्यात आली व त्याचे नेतृत्व अध्यक्ष म्हणून माझ्याकडे देण्यात आले. ही मी माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो. – संस्थेची 1987 साली श्रमदानातून बांधलेली इमारत व इमारतीखालील क्षेत्र सिडकोच्या नियोजनात मुख्य रस्त्याखाली आल्याने ती जागा व शाळेची इमारत स्थलांतरीत करावी असा प्रस्ताव सिडकोतून आला असता सिडकोने विकास नियोजनात भव्य वास्तु देण्याचे सुचवले असता संस्थेने स्वतंत्र भुखंड देण्याचा प्रस्ताव ठेवला. मोकळे भुखंड देण्याचे आमच्या नियमात नाही असे सिडकोने सांगितले त्यावेळी संस्था आपणास सहकार्य करीत आहे, सबब आपण नियमामध्ये बदल करून मोकळा भुखंड द्यावा असा आग्रह केला व त्याप्रमाणे सिडकोने संस्थेला सेक्टर 6,8 व संकुलन असलेले सेक्टर 17 मधील भुखंड 22/23 क्षेत्र सुमारे 12124 चौ. मिटर आम्हास सुचविण्यात आले. सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. मा. श्री. ए.टी. पाटील यांच्या सल्ल्यानुसार आम्ही संस्थेने प्राथमिक विभागासाठी 1500 चौ. मिटर, माध्यमिक विभागासाठी 3000 चौ. मिटर व कीडांगणासाठी 7124 चौ. मिटर क्षेत्राची मागणी केली व त्याप्रमाणे आम्हास भुखंड 22 इमारतीसाठी व भुखंड क्रमांक 23 मैदानासाठी देण्यात आले. त्यावेळेस टेंडर किमंत 35000 प्रति चौ. मिटर प्रमाणे विक्री चालू होती व रिझर्व किंमत 500 प्रति चौ.मिटर होती. सिडकोच्या प्रकल्पग्रस्त संस्थांना सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी द्यावयाचे दर रिझर्व किंमतीच्या दहा टक्के असल्याने आम्हांस सदर जागा 50 रूपये प्रति चौ. मिटर दराने देण्याचे मान्य झाले व त्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे माध्यमिक विद्यालयासाठी असलेली 4500 चौ. मिटरची जागा आम्हांला देण्यात आली परंतु संस्थेकडे त्यावेळेस इतकी रक्कम नसल्याकारणाने संस्था संचालकांकडून संस्थेच्या खात्यामध्ये अनामत रकमा घेण्यात आल्या व सिडकोकडे किंमत रक्कम भरून भुखंड ताब्यात घेण्यात आला. सदरकामी संस्थेच्या सदस्यांनी दिलेल्या योगदानाचे मी प्रामुख्याने गौरव करतो.

संस्थेने सिडको कडून घेतलेल्या सुमारे 12124 चौ. मिटर( इमारत 4500 चौ. मिटर + 7124 मैदान चौ.मिटर) भुखंड क्रमांक 22/23 सेक्टर 17 कोपरखैरणे या भुखंडावर सुमारे सहा कोटी रक्कमेची भव्य वास्तु निर्माण केली आहे. भुखंडाची किंमत चालु बाजार भावाप्रमाणे सुमारे 12 कोटी इतकी आहे.

सर्व प्रथम संस्थेच्या माध्यमिक विद्यालयासाठी कै. महादू बरोरा, तत्कालीन आमदार शहापूर यांच्या सहकार्याने शिक्षण खात्याकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दिनांक 7 नोव्हेंबर 1987 रोजी इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले व ज्ञानयज्ञाचे पहिले पुष्प गुंफण्यात आले, श्री व्ही.डी. पाटील या अनुभवी शिक्षकाची मुख्याध्यापक पदी निवड करण्यात आली व त्यांना साथ देण्यासाठी सौ. सुजला म्हात्रे, श्री एस.आर. पाटील, श्री सुभाष आहिरराव यांची सहशिक्षक व लेखनिक म्हणून श्री. रमाकांत आगास्कर तर शिपाई म्हणून श्रीमती इंदुबाई गायकवाड यांना नेमण्यात आले व ख-या अर्थाने संस्थेची शैक्षणिक वाटचाल सुरू करण्यात आली. पुढे सन 1992 साली प्राथमिक विद्यालय, सन 1997 साली उच्च माध्यमिक विद्यालय (ज्युनियर कॉलेज), सन 2007 साली वाणिज्य महाविद्यालय (सिनियर कॉलेज), सन 2005 साली इंग्रजी विद्यालय, सन 2011 साली डी.एड. कॉलेज सुरू करण्यात आले. सन 2005 साली एम.एस.सी.आय.टी. सह श्री.एस.एम. म्हात्रे आय.टी. महाविद्यालय सुरू करण्यात आले. ” ज्ञान गंगा घरोघरी या उक्ती नुसार सन 2005 साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सुरू करण्यात आले त्याच बरोबर मुंबई विद्यापिठाचे दुर – मुक्त अध्ययन केंद्र सन 2011 साली सुरू करण्यात आले. आजमितीस संस्थेच्या ज्ञान विकास संकुलनात बहुजन समाजाचे 7500 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे.

आमच्या या ज्ञान विकास संस्थेच्या ज्ञानरूपी रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्यासाठी आमदार कै. महादू बरोरा साहेब, माजी मंत्री अॅड. लिलाधर डाके साहेब, श्री जनार्दन गौरी, श्री हरबन्स सिंग, आमदार श्री. शशिकांत शिंदे, माजी मंत्री श्री. गणेशजी नाईक या मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

संस्थेतर्फे टाटा एज्युकेशन व CBM या संस्थांच्या माध्यमातून 23 वर्गखोल्यांमध्ये ‘ई’ एज्युकेशनचे शिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे सुमारे 150 संगणकांच्या माध्यमातून तीन सभागृहांमध्ये संगणक कक्ष व एका वर्गामध्ये ए.व्ही. रूमच्य’ माध्यमातून संगणक शिक्षणाची सुसज्ज सेवा उपलब्ध केली आहे. सर्व सोयींनी प्रशस्त क्रिडांगण, प्रशस्त ग्रंथालय, अभ्यासिका, ‘ई’ ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा व प्रशस्त सभागृह अशा साधनांनी सक्षम शिक्षण देण्याचे प्रयत्न संस्था करीत आहे त्यामुळे संस्थेच्या इ.10वी व 12वी बोर्डाचा निकाल सातत्याने 95 ते 99 टक्के पर्यंत राखण्यात संस्थेला यश मिळत आहे. सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टसच्या अभ्यासक्रमाप्रमाणे ‘बीग आर्टस’ संस्थेच्या माध्यमातून डिप्लोमा अॅन्ड ग्राफीक्स, फोटोग्राफी पेंटींग, अॅक्टींग (अभिनय),डिप्लोमा अॅन्ड आर्ट्स टिचर असे विविध कोर्सेस सहा महिने ते दोन वर्ष अशा कालावधीचे कला शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या “श्री. एस.एम. म्हात्रे आय.टी. सेंटर” केंद्रातून एम.एस.टी. आय.टी. ग्राफीक्स डिझायनिंग वबे डिझायनिंग, ई-टॅक्सेशन, डि.सी.आय, बँकिंग, प्रोग्रामिंग, हार्डवेअर अॅन्ड नेटवर्कीग वगैरे कोर्सेस तसेच पंतप्रधान कौशल्य विकास उपक्रमातून नोकरीची हमी असलेले इलेक्ट्रीशियन, मोबाईल रिपेअरिंग, कुरिअर असे रोजगाराच्या संधीची हमी देणारे अभ्यासक्रम मोफत राबविले जातात. संस्थेच्या माध्यमातून आजमितीस एम.कॉम. पर्यंतचे वर्ग चालविले जात आहेत. विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या माध्यमातून शिक्षण प्रणाली त्याचप्रमाणे पॅरामेडीकल पॅथोलॉजीचे वर्ग सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेच्या प्रांगणात दररोज संध्याकाळी व रविवारी पूर्ण दिवस सर्वांगीण शिक्षणासाठी कराटे, योगा, शिवकालीन शस्त्र वगैरे अनेक शैक्षणिक उपक्रमांची व भारतीय नृत्य व संगीत इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव असलेले विविध प्रकारचे उपक्रम संकुलनात सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गुणवंत खेळाडू निर्माण करण्यासाठी क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो वगैरे खेळामधील तज्ञांच्या सहकार्याने प्रशिक्षणाचे उपक्रम चालू आहेत. त्यासाठी संस्थेने पुरक व्यवस्थापन व साधनसामुग्री निर्माण केली आहे.

भाताच्या उत्तम पिकाने व्यापलेले हे क्षेत्र संचालकमंडळाच्या अपार कष्टाने व देणगीदारांच्या सहकार्याने आज ज्ञान यज्ञासाठी वापरात आणण्यात आम्हांला यश आले याचा संस्थेला सार्थ अभिमान वाटतो. संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणा-या प्राथमिक विभाग (मराठी) माध्यमाच्या 27 वर्ग तुकड्या व माध्यमिक व उच्चमाध्यमिक 23 वर्ग तुकडया, इंग्रजी माध्यमिक विभागच्या 29 वर्ग तुकड्या वाणिज्य महाविद्यालयाच्या 6 वर्ग तुकडया तर डी.एड. कॉलेजच्या 2 वर्गांपैकी फक्त 27 वर्गाना अनुदान मिळते. दुसरे सर्व विभाग विनाअनुदान तत्वावर आहेत व त्यासाठी वार्षिक 1,70,00,000/ रुपये खर्चाची तरतूद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना पगार देण्यासाठी करावी लागते.

याप्रसंगी खास निवेदन करून संस्थेच्या प्राथमिक विकासात माझे जेष्ठ सहकारी बंधु कै नामदेव रामा पाटील व श्री मोरेश्वर चिंतामण पाटील यांच्या मोलाच्या सहकार्याची व परीश्रमाची नोंद घेणे हे मी, अध्यक्ष म्हणून आद्य कर्तव्य समजतो. कारण आम्ही तिन्ही संस्थापकांनी जनतेच्या सेवेसाठी हे विश्व निर्माण करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती या स्वरूपात जी अतिशय मेहनत घेतली आहे त्याची नोंद या प्रकल्पात सदैव राहील याची मला आशा आहे.

संस्था सर्व सभासद, संचालक व पदाधिकारी हे एक दिलाने व विश्वासाने कार्य करीत आहेत असाच विश्वास सर्व जनता जनार्दनाकडून मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करून संस्थेच्या त्रिदशकाचा अहवाल पूर्ण करीत आहे.

जय हिंद!  जय महाराष्ट्र!